jump to navigation

esakal- आरोग्यदूत तंत्रज्ञान!( डॉ. अमोल गोजे ) March 7, 2009

Posted by prasannam in फॅमिली डॉक्टर.
trackback

सर्वोत्तम आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत वेगाने पोचविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा कसा प्रभावी वापर करता येतो, याचे प्रभावी प्रतिमानच बारामतीमधील “आरोग्यजाल’ उपक्रमाने उभे केले आहे. त्याची माहिती… …….
पूर्वी संपर्कासाठी “दूत’ महत्वाचा मानला जात असे. आजच्या आधुनिक काळात संपर्कसाधनात होत असलेल्या क्रांतीमुळे “इंटरनेट’ हा जागतिक पातळीवर सर्वांचाच दूत बनलेला आहे आणि हा दूत बारामती परिसरातील नेत्र व हृदयरुग्णांकरीता आता चक्क “देवदूत’ बनू पाहत आहे. इंटरनेटने अनेक क्षेत्रांत जशी क्रांती घडविली, तशीच ती आरोग्य क्षेत्रातही घडत असल्याचे आता बारामती परिसरात प्रत्यक्ष पाहता येऊ शकते. या परिसरातील डोळे व हृदयाबाबत तक्रारी असलेल्या रुग्णांना आता इंटरनेटच्या माध्यमातून थेट मदुराईचे “अरविंद आय हॉस्पिटल’ आणि बंगळूरचे “नारायणा हृदयालय’ या नामांकित रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला सहज उपलब्ध होतो.

“टेलिमेडिसीन’ संकल्पनेतून ही अशक्‍यप्राय वाटणारी बाब बारामतीत प्रत्यक्षात उतरली असून या सुविधेचा फायदा या परिसरातील लोक घेऊ लागले आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचा माहिती तंत्रज्ञान विभाग (व्हीआयआयटी), माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर कंपनी “इंटेल’ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने “आरोग्यजाल’ हा कार्यक्रम प्रत्यक्षात उतरला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आणि काही अवघड प्रकरणांत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परस्परांशी चर्चा करणे अशी दुहेरी कामे बारामती एमआयडीसीतील रुई ग्रामीण रुग्णालयात आता होत आहेत. २ नोव्हेंबर २००६ पासून या प्रकल्पाची सुरुवात झाली. यातही वैशिष्ट्य असे की हृदयरुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला बंगळूरहून अवघ्या दहा मिनिटांत; तर डोळ्यांसाठीचा सल्ला मदुराईहून अवघ्या २४ तासांच्या आत बारामतीत मिळतो. रुग्णालाही हा सल्ला पाहता येतो. त्यानुसार पुढील काय पावले उचलायची हे ठरविण्यासाठीही त्याला मदत होते.

या “आरोग्यजाल’ उपक्रमांतर्गत रुई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांच्या “हृदयाचा आलेख’ म्हणजेच “ईसीजी’ काढला जातो. “ईसीजी’साठी सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या तंत्रापेक्षा या “ईसीजी’साठी वापरले जाणारे तंत्र थोडे वेगळे आहे. त्यामुळे हा ईसीजी “डिजिटल’ स्वरूपात संगणकाच्या पडद्यावर पाहता येतो आणि रुग्णालयातील संगणकामध्ये साठवूनही ठेवला जाऊ शकतो. यासोबतच रुग्णाचे वजन, उंची, रक्तदाब, त्याच्या वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांतून मिळालेली आणि पूर्वी याच आजाराकरिता इतर डॉक्‍टरांकडून औषधोपचार घेतले असल्यास त्याबाबतची अशी सर्व माहितीही संगणकावर साठवून ठेवलेली असते. बारामतीतील डॉक्‍टर इंटरनेटद्वारे रुग्णाचा ईसीजी आणि ही अन्य माहिती बंगलोर येथील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे पाठवितात. तेथे ते डॉक्‍टर या साऱ्या माहितीचे विश्‍लेषण करून चर्चेअंती रोगनिदान आणि उपचारांची रूपरेषा निश्‍चित करतात. त्यांनी दिलेला वैद्यकीय सल्ला इंटरनेटद्वारे तातडीने रुई प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला जातो. त्यानुसार स्थानिक डॉक्‍टर रुग्णाला पुढील सूचना देतात. या सूचनांवर आधारित योग्य तो निर्णय रुग्णाने घ्यावा, अशी त्यामागील कल्पना आहे. पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी रुग्ण बंगळूर येथे गेला तर त्याला सगळ्याच बाबतीत चांगल्या सवलती प्राप्त होतात.

डोळ्यांचे आजार असलेल्या रुग्णांबाबत ही प्रक्रिया अशीच पण, थोडी वेगळ्या पद्धतीने होते. त्यासाठी डोळ्यांचे तपासणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणावर कॅमेरा बसवून डोळ्याच्या बाह्य व अंतर्पटलाची छायाचित्रे काढली जातात. या प्रतिमा व त्या रुग्णाची पार्श्‍वभूमी, त्याने घेतलेले औषधोपचार यांची माहिती इंटरनेटवरून मदुराईला पाठविली जाते, त्या नुसार तेथील डॉक्‍टर पुढील सल्ला देतात. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पुण्याच्या ह. वि. सरदेसाई रुग्णालयात मोफत केली जाते.

या दोन्ही सुविधांकरीता रुई ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र “टेलिमेडिसीन दालन’ उभारण्यात आले असून, येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचीही सुविधा आहे. एखाद्या रुग्णासंदर्भात प्रत्यक्ष संपर्क साधून चर्चा करण्याची आवश्‍यकता वाटल्यास या सुविधेचा वापर करण्यात येतो. त्यात रुई प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या रुग्णाची त्या क्षणी असलेली नेमकी स्थिती बंगळूरच्या डॉक्‍टरांना पाहता येते, तसेच त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या स्थानिक डॉक्‍टरांशी थेट चर्चा करून त्यांना सल्ला देता येतो. स्थानिक डॉक्‍टरांनाही रुग्णाची स्थिती अधिक सविस्तर समजावून सांगता येऊ शकते आणि काही शंकांचे निरसन तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून करून घेता येऊ शकते. एरवी बरेच श्रम, वेळ आणि पैसा खर्ची घालावे लागणारी ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांच्या वेळात अगदी अत्यल्प खर्चात सहजपणे पूर्ण करता येऊ शकते. आजवर ३७५ हृदयरुग्ण व १५० हून अधिक नेत्ररुग्णांना या पद्धतीने सल्ला सुविधा देण्यात आली. या पैकी ३० रुग्ण असे होते की ज्यांना बंगलोर किंवा मदुराईला या कामासाठी जाणे आर्थिकदृष्टया परवडणारे नव्हते. त्यांना या सुविधेमुळे अत्यल्प दरात सल्ला प्राप्त करून घेता आला. वाजवी दरात मिळणारा खात्रीशीर सल्ला असेच याचे वर्णन करता येईल.

केवळ बारामतीच नव्हे; तर शेजारील तालुके व जिल्ह्यांतील रुग्णांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. अंबुमणी रामदास यांनी त्यांच्या बारामती भेटीत या उपक्रमाची सविस्तर माहिती घेऊन समाधान व्यक्त केले आणि अशा प्रकारची सुविधा देशभरातील दुर्गम भागांत उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्याच्या आणखी काही जिल्ह्यांत असे प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त केला. आरोग्याचा उत्तम सल्ला शहरी व ग्रामीण भागातील लोकांना आपल्या गावातच मिळावा या करिता इंटरनेट व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा हा करून घेतलेला उपयोग भविष्यात राज्य व देश पातळीवर एक दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.

(शब्दांकन – मिलिंद संगई, बारामती)

– डॉ. अमोल गोजे
(डॉ. अमोल गोजे हे व्हीआयआयटीचे संचालक आहेत.)

Advertisements

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: