jump to navigation

esakal-परामेश्वराचा शाप की वरदान? ( डॉ. श्री बालाजी तांबे ) March 7, 2009

Posted by prasannam in फॅमिली डॉक्टर.
trackback

लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत नाहीत असे म्हणतात. पण सध्या लक्ष्मी व सरस्वती दोघी गुण्यागोविंदाने नांदत आहेत असे म्हणण्यासारखी परिस्थिती वरवर तरी दिसते. खरे पाहता लक्ष्मी या शब्दाचा लौकिक अर्थ पैसा असा समजला जातो व त्यामुळे सध्या लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत आहेत असे दिसते. परंतु, लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे तर त्यातून समृद्धी असा अर्थ अभिप्रेत आहे. आरोग्य, धन-धान्य, पशु, घर-दार, पुत्र-पौत्र, संपत्ती, कीर्ती व शांती ह्या सर्व गोष्टींचा समृद्घीमध्ये समावेश होतो. म्हणजे काय की, समृद्धी जर सरस्वतीच्या बरोबर आली तरच ती मनुष्याला अंतिम ध्येयापर्यंत पोचवते व शांती प्रदान करते. …….
सध्या अत्यंत बुद्धिमान मुले कॉम्प्युटर, इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी व एकूण सर्व संगणकाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी धडपडतात. बुद्धिमत्ता असलेले व चांगले गुण मिळालेले सर्वजण शिक्षण घेतात व नंतर त्यांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात. संगणकाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्याच सध्या जगातल्या श्रीमंत कंपन्या झालेल्या दिसतात. अशा तऱ्हेने जेथे ज्ञान आहे तेथे लक्ष्मी निर्माण झालेली दिसते. अर्थात हे ज्ञान एका विशिष्ट शाखेपुरते मर्यादित नाही. इतर शाखांमध्येही काही मंडळी अतोनात पैसा कमावतात. एखादा हुशार वकील स्वतःची एकवेळ उपस्थिती दाखविण्यासाठी पाच लाख रुपये मागू शकतो. आर्थिक सल्लागारसुद्धा तासागणिक लाखो रुपये कमाई करताना दिसतात. तर, सिनेमात प्रसिद्ध झालेली मंडळी तर नुसते व्यासपीठावर येण्यासाठी ४०-५० लाख रुपये मागू शकतात.

प्रत्येक क्षेत्रात सध्या ज्ञानाची किंमत पैशात झालेली दिसते. समाजातल्या खालच्या व वरच्या वर्गात एवढी आर्थिक तफावत का आहे हे काही समजून येत नाही. समाजातील घटकांची आर्थिक दरी वाढत जायला कारण असणारे ज्ञान कुठले आहे हे मात्र विशेषत्वाने दाखविता येत नाही. अर्थात हे सर्व मिळविलेल्या पैशांमुळे समाजात विषमता उत्पन्न झाली तर नंतर त्या पैशांचा उपयोग होणार नाही व कुठल्या तरी अराजकालाही आमंत्रण मिळू शकेल. म्हणजेच काय तर ज्यावेळी लक्ष्मी-सरस्वतीची मैत्री ही केवळ पैसा व सरस्वती यांची मैत्री असेल पण समृद्धी व सरस्वती एकत्र नसतील तेव्हा खरे पाहता सामाजिक आरोग्य बिघडण्याचाच संभव जास्ती असतो.

या संपूर्ण ज्ञानाच्या शाखेला दिलेला “इ’ हा शब्द इलेक्‍ट्रॉनिक्‍स वरून घेतलेला आहे. अणुपर्यंत जाऊन पोचल्यावर न्यूट्रॉन व इलेक्‍ट्रॉन यांच्या स्वरूपाचा, गतीचा व गूढतेचा शोध घेणे परमात्म्याचा शोध घेण्यासारखेच आहे. ज्या ज्या वेळी आत्मतत्त्वाचा म्हणजे परमानंदाचा शोध घेण्याची वेळ येते त्या त्या वेळी परमगतीची आवश्‍यकता असते असे श्रीमद्‌भगवद्‌गीता म्हणते. या परमगतीत एक गोष्ट लक्षात येते की मध्ये काही अशी निमिषे जातात की त्यावेळी आपण ज्याच्यामागे लागलेलो आहे ती शक्‍ती अदृश्‍य झाल्यासारखी दिसते. त्यामुळे हे गूढ अधिकच अनाकलनीय होते. भौतिक ज्ञानाच्या कक्षा रुंदावता रुंदावता जेव्हा इलेक्‍ट्रॉनपर्यंत येऊन पोचल्या त्यावेळी एक अप्रतिम शक्‍ती समाजासाठी मोकळी झाली व त्या शक्‍तीशी काम करणाऱ्या शाखेला “इ’ शाखा असे संबोधित करण्यात आले.

या क्षेत्रात काम करणारी बरीच मंडळी स्वतःचे गाव इतकेच नाही तर स्वतःचा देश सोडून परदेशात अशा ठिकाणी जाऊन राहतात, जेथे त्यांचे सामाजिक स्थान दुय्यम असते. तेथे सामाजिक जीवन व सांस्कृतिक जीवन कसेबसे तयार करून जगावे लागते म्हणजेच पुन्हा सामाजिक आरोग्याला बाधा येते असे म्हणायला हरकत दिसत नाही.

जागेवर बसून राहणाऱ्याला कधीच आर्थिक लाभ मिळू शकत नाही हे खरे, पण म्हणून एक गोष्ट मिळवताना दुसरी महत्त्वाची गोष्ट सोडून द्यायची असा व्यवहार आतबट्ट्याचाच समजायला पाहिजे. लक्ष्मीची व सरस्वतीची ही मैत्री येणे-जाणे, उठणे-बसणे इथपर्यंतच्या मर्यादेत राहिली तर सर्वांनाच समाधान व सुख लाभू शकेल. म्हणजेच पैसा हे जीवनाचे एक महत्त्वाचे अंग आहे हे नक्की परंतु ते सर्वस्व नाही व हा विषय समाजिक आरोग्यापुरता मर्यादित न राहता मानसिक आरोग्यावरही मोठा आघात करतो. “इ’क्षेत्रातील लक्ष्मीची कृपा झालेली मंडळी मोठ्या मानसिक ताणाखाली वावरत असतात.

गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाला ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर उभे केले व चेंडू टाकणारा समोरून नुसता पळत आला तरी चेंडू नावाची वस्तू आली केव्हा गेली केव्हा हे समजायच्या आधी अंतर्धान पावेल, बरोबर तिन्ही स्टंप घेऊन तर जाईलच, कदाचित बॅटही घेऊन जाईल व खेळाडू मात्र घामाघूम होईल. ही उपमा घेण्याचे कारण असे की संगणकाची काम करण्याची पद्धत एवढी सर्वंकष व विकसित झाली आहे, व त्याची गती “मनासि टाकिले मागे गतीशी तुळणा नसे’ अशीच आहे. मोठे प्रसंग, मोठ्या अडचणी, मोठी गणिते चुटकीसरशी सोडविणारा आणि हजारो गोष्टींचा विचार करून निर्णय घेणाऱ्या संगणकाबरोबर काम करणाऱ्याची दमछाक न झाली तरच नवल. संगणकाच्या बुद्धीबरोबर पळाल्याने मानसिक ताण येणारच. या मानसिक ताणापायी मग नाना तऱ्हेची व्यसने लागू शकतात व या मंडळींना नको त्या ठिकाणी पैसे खर्च करायचा मोह होऊ शकतो. लाख मिळाले आहेत तर आत करोड मिळवायला हरकत नाही या विचाराने मारलेल्या उड्यांपायी मानसिक ताण नक्कीच वाढतो. हा सर्व बुद्धीचा प्रताप म्हणावा तर या बुद्धीच्या कामासाठी किती वेळ द्यावा याचाही काही हिशेब दिसत नाही. ही मंडळी काही एक निश्‍चित वेळ काम करतील असे दिसत नाही. रात्रंदिवस काम केले तर शारीरिक ताणाबरोबरच मानसिक ताण येऊ शकतो, मानसिक दोष उत्पन्न होऊ शकतो, मानसिक इजाही होऊ शकते. डोळ्यांना किती तासांपर्यंत चकचकीत वस्तूकडे पाहू द्यायचे याचा काही नियम दिसत नाही. ज्याअर्थी संगणकाचा किंवा टीव्हीचा स्क्रीन आजूबाजूच्या वातावरणापेक्षा प्रकाशमान आहे, त्याअर्थी त्या पडद्याकडे सतत पाहिल्यास नक्कीच शरीरात पित्त वाढते, त्यामुळे संगणकावर सतत काम करणाऱ्या मंडळीना डोळ्यांची, डोळ्यांच्या नसा, मेंदूच्या नसांची काळजी घेणे आवश्‍यक असते. विचार करता करता संगणकाबरोबर पळण्यानेही मेंदूत उष्णता निर्माण होऊनही त्रास होताना दिस
तो. “इ’आरोग्याचा विचार करताना संपूर्ण यंत्रणेला त्रास देणारा असा भयंकर रोगाचा व्हायरस आणि त्यामुळे मेंदूला होणारा त्रास हा जसा लक्षात घ्यावा लागेल तसेच नको असलेली माहिती, वेळेचा अपव्यय आणि रेडिएशन यामुळे मनुष्याच्या मेंदूतही एखादा व्हायरस येऊन रोग उद्भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

आधुनिक जगाचा पालनकर्ता, सुपरकॉम्प्युटर (परमसंगणक) मानवतेस वरदान की शाप ठरेल? श्री गुरु दत्तात्रेय व्यावाहारिक, मानसिक व अध्यात्मिक पातळीवर मार्गदर्शन करून मनुष्यमात्राचे कल्याण व संरक्षण करतात, कलियुगात त्यांना तीन डोकी दाखवून भारतीय अध्यात्मामध्ये मोठी संकल्पना सुचवलेली दिसते. आपण जेव्हा बाहेरचा संगणक किंवा “इ’ क्षेत्रातली कुठलीही साधनसामुग्री वापरतो तेव्हा आपण जणू बाहेरच्या मेंदूंना जोडून घेतो, म्हणजेच “ई’श्‍वरचा परम ईश्‍वर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु याची व्याप्ती तीन मस्तके म्हणजे तीन मेंदूंपर्यंतच मर्यादित राहावी व अतिरेक होऊ नये. यापेक्षा जास्ती डोकी असणाऱ्यांचा शिरच्छेद झाल्याची उदाहरणे आपल्याला सापडतात (उदा. ब्रह्मदेव). या बाहेरून जोडलेल्या डोक्‍यामुळे अनेक प्रकारच्या सिद्धी मिळतात पण या डोक्‍यांची संख्या दहा झाल्यावर रावणाचे काय झाले ही कथा मनुष्यजातीला असलेला धोका सुचवते. “इ’क्षेत्राच्या सिद्धीचा केवळ स्वार्थासाठी उपयोग न करता मानव कल्याणाची योजना असावी.

तेव्हा “इ’ क्षेत्राने मनुष्यमात्राचे कल्याण साधायचे असल्यास आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. त्यातली पहिला गोष्ट म्हणजे आपण सूक्ष्मापर्यंत किंवा अति गूढ विषयापर्यंत पोचलेले असल्यामुळे त्यातून येणारी बंधने नक्कीच पाळावी लागतील. शक्‍तिउत्सर्जन किंवा रेडिएशनचा त्रास होणार नाही हे नक्कीच बघावे लागेल, कारण या क्षेत्राशी खेळत असताना वापरलेली सर्व साधने शक्‍ती उत्सर्जित करणारीच असतील. मनुष्य मनानेही पळू शकणार नाही एवढी गती या सर्व क्षेत्राची असल्यामुळे त्या गतीने बुद्धीला पळावयास लावणे खरोखरच अवघड आहे व त्या गतीने खरोखर पळायचे असले तर आपल्याला बुद्धिवर्धनासाठी आयुर्वेदाची मदत घेण्याचीच आवश्‍यकता भासेल. शुद्घिप्रक्रिया या क्षेत्रात खूपच महत्त्वाची आहे त्यामुळे आयुर्वेदोक्‍त पंचकर्मासारखी शरीरशुद्धी वारंवार करून घ्यावी लागेल. त्याही पलीकडे जाऊन मनाला एकाग्रतेची व शांततेची सवय लावण्यासाठी दिवसातून, महिन्यातून व वर्षातून काही वेळ ध्यान, धारणा, स्वास्थ्यसंगीत यांच्यासाठी नक्की द्यावा लागेल. अशा प्रकारे सर्व बाजूंना काळजी घेतली नाही तर समृद्धी व सरस्वतीची मैत्री झाल्यामुळे होण्याऱ्या उत्क्रांतीऐवजी नुसतीच लक्ष्मी व सरस्वती यांच्या मैत्रीतून त्रास उद्भवण्याचा संभव आहे. म्हणून लक्ष्मी व सरस्वती एकत्र राहात नाहीत असे म्हटले जाते. तेव्हा या विद्येचा वापर सृजनात्मक कार्यासाठी होत आहे याकडे लक्ष ठेवायचे व या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी आपण जणू या नवीन युगातील वैज्ञानिक ऋषी या भूमिकेवर काम करत आहोत ही जाणीव ठेवून स्वतःच्या व समाजाच्या कल्याणासाठी काम केले तरच या “इ’ क्षेत्रामुळे आपणा सर्वांना समृद्धीचा अनुभव घेता येईल.

– डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला ४१० ४०५.
http://www.ayu.de

Advertisements

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: